पुणे शहरातील व्यायामशाळांमधील सोयी-सुविधा व सदस्यांच्या समाधानाचा विश्लेषणात्मक अभ्यास
##article.abstract##
सध्याच्या काळात वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली, शारीरिक निष्क्रियता आणि आरोग्यविषयक जागरूकता यामुळे व्यायामशाळांचे (Gymnasiums) महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. व्यायामशाळा या केवळ शरीरसौष्ठव किंवा फिटनेसपुरत्या मर्यादित न राहता शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य संवर्धनाची महत्त्वाची केंद्रे बनत आहेत. तथापि, प्रत्येक व्यायामशाळेमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा, मार्गदर्शकांची गुणवत्ता, व्यवस्थापन पद्धती व सदस्याभिमुख दृष्टिकोन यामध्ये फरक आढळतो, ज्याचा थेट परिणाम सदस्यांच्या समाधानावर, सहभागावर व सदस्यसंख्या वाढीवर होतो.
प्रस्तुत संशोधनाचा उद्देश पुणे शहरातील व्यायामशाळांमधील सोयी-सुविधा, मार्गदर्शकांची भूमिका, व्यवस्थापन वैशिष्ट्ये आणि त्यांचा सदस्यांच्या समाधानावर व व्यायामशाळेच्या सातत्यपूर्ण विकासावर होणारा परिणाम यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करणे हा आहे. या अभ्यासासाठी सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून पुणे शहरातील विविध भागांतील ३९ व्यायामशाळा/मार्गदर्शकांकडून स्वनिर्मित मराठी प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात आली. प्रश्नावलीत होय-नाही तसेच बहुपर्यायी (Multiple Response) स्वरूपाचे प्रश्न समाविष्ट होते. संकलित माहितीचे विश्लेषण वारंवारता व टक्केवारी या सांख्यिकीय तंत्रांचा वापर करून करण्यात आले.
अभ्यासातून असे आढळून आले की बहुसंख्य व्यायामशाळा नोंदणीकृत असून त्यांच्याकडे मध्यम स्वरूपाची सदस्यसंख्या आहे. बहुतांश व्यायामशाळांमध्ये साधनसामग्री, सुरक्षितता उपाययोजना व प्रथमोपचार प्रशिक्षण समाधानकारक आढळले. मार्गदर्शकांमध्ये व्यावसायिक समाधानाची पातळी उच्च असून इंटरनेट व प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे ज्ञानवृद्धी करण्यावर भर दिला जातो. तसेच, सोयी-सुविधा, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि विविध उपक्रम हे सदस्यसंख्या वाढ व सातत्य टिकविण्यासाठी निर्णायक घटक असल्याचे स्पष्ट झाले. या निष्कर्षांवरून व्यायामशाळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सदस्याभिमुख, सुरक्षित व नवोपक्रमात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे अधोरेखित होते.