'पिढीपेस्तर प्यादेमात' काव्यसंग्रहामधील कृषिसंस्कृती
##semicolon##
ग्रामसंस्कृती##common.commaListSeparator## साठोत्तरी साहित्य प्रवाह##article.abstract##
संतोष पद्माकर पवार यांचा 'पिढीपेस्तर प्यादेमात' (२००८) हा ग्रामीण कवितासंग्रह आहे. यामध्ये त्यांनी शेती, शेतकरी, त्याची संस्कृती यांच्या स्थितीचे वर्णन केले आहे. या कृषिवलांच्या संस्कृतीमधील गावखुरांच्या रीतीची, मजुरांच्या घामाची, बाईपणाच्या मातीची आणि कुणब्यांच्या जीवाची झडती घेण्याचे काम संतोष पवारांनी 'पिढीपेस्तर प्यादेमात' या काव्यसंग्रहात केली आहे. पिढीपेस्तर प्यादेमात म्हणजे प्रत्येक पिढीनंतर येणाऱ्या पिढीच्या वाट्याला नशिबाने आलेला भोगवटा, कष्ट, संघर्ष होय. वंशपरंपरेतून ही प्यादेमात चालत येते. याविषयी प्रा. रा. ग. जाधव म्हणतात, "आपल्या ग्रामीण जीवनातील शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, तमाम स्त्रीवर्गाची, हिंदू-मुस्लीम आदि सर्व धर्मीय रयतेची, उरल्यासरुल्या अलुत्या बलुत्यांची, कारूनारूंची पण एवढेच नाही. ग्रामीण परिसरातील निसर्ग, पशुपक्षी, हवापाणी यांच्याही नशिबी हीच प्यादेमात आहे." अशी ही प्यादेमात कृषिजन संस्कृतीच्या वाट्याला आली. या काव्यसंग्रहात कुणबी, मजूर, गाय व स्त्री यांच्या आयुष्याचा ताळेबंद मांडला आहे. झडती एक या विभागामध्ये बाईचे आयुष्य, विविध परंपरा, रूढी, स्त्रीचे जीवन, कष्ट, संघर्ष, त्याग, अभावग्रस्तता यांचे चित्रण केले आहे. 'माती' या कवितेत स्त्रीचा त्याग दिसतो. जन्मभर राबून स्त्रीला दमडीची पत मिळत नाही. तिच्या पोटी जन्म घेऊनही तिला पुरूषांनी ठोकारले. 'सासराला निघताना' या कवितेत आई व मुलगी यांचा संवाद येतो. सासरचे कष्ट, कुटुंबाची जबाबदारी, करावा लागणारा त्याग याविषयी ही आई आपल्या मुलीला ज्ञानाचे धडे देते. सासरी नांदताना कोणताही जुलूम सहन करू नये. तशी परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीशी झुंज यायला तयार असावे, अशी शिकवण ही आई देते आहे. अन्यायग्रस्त स्त्रीचे वर्णन 'बोल सये' या कवितेत येते. तर 'बाप-सात पोरींचा' या कवितेत सात मुलींच्या बापाची चिंता व्यक्त होते. मुलींच्या लझानासाठी करावा लागणारा खर्च, त्यातील रीतभात यामुळे हा बाप चिंतातूर झाला. सात मुलींसाठी दादले मिळविण्याची त्याला चिंता आहे. अस्वस्थ मनःस्थितीमध्ये तो जगतो. स्त्री जीवनाचे वास्तवचित्र येथे पहायला मिळते. 'भांडण' या कवितेमधून ग्रामसंस्कृतीमधील कुटुंबातील कलह चित्रित केला आहे. सासू व सून या दोन्ही स्त्रियां असूनही एकमेकींशी नेहमी भांडतात. यातून कौटुंबिक कलह वाढतो. बाप मुलाला मारतो. तर मुलगा बायकोला यामुळे सासूला आनंद झाला आहे. एकूणच या कौटुंबिक भांडणांमुळे कुटुंबाचे स्वास्थ्य नष्ट झाले.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##submission.citations##
पवार, संतोष पद्माकर, 'पिढीपेस्तर प्यादेमात', पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, प्र. आ. २००८.
२. भोसले, द. ता., 'ग्रामीण साहित्यः एक चिंतन', मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्र. आ. १९८८.
३. लिंबाळे, शरणकुमार, 'साठोत्तरी मराठी वाङ्मयीन प्रवाह', दिलीपराज प्रकाशन, पुणे, प्र. आ. २००७.
४. यादव, आनंद, 'ग्रामसंस्कृती', मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, प्र. आ. २०००.