एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रात ख्रिस्ती मिशनरी शिक्षणाचा प्रभाव:
##semicolon##
ख्रिस्ती मिशनरी##article.abstract##
महाराष्ट्रीय समाजाला ख्रिस्ती धर्माचा परिचय सोळाव्या शतकापासून होता. स्कॉटिश मिशनरी जेम्स मरी मिचेल १८३८ मध्ये भारतात आल्याबरोबर वसईला गेला होता; तेव्हा त्याला तिथे २०,००० ख्रिस्ती धर्मांतरित लोक राहत असल्याचे दिसले. पंचवीसहून अधिक चर्चेस तिथे होती पण बहुतेक सगळे पडझड झालेली आणि कोणीही धर्मप्रसार करत नव्हते. मुंबई आणि वसई हा परिसर मुळात पोर्तुगीजांकडे असल्याने येथे कॅथलिक ख्रिश्चन लोकांचे प्रमाण भरपूर होते. त्यानंतर मुंबईमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात प्रोटेस्टंट मिशनरी आले. अमेरिकेहून पाच मिशनरी १८१२ मध्ये कलकत्त्याला आले. या काळात ब्रिटिश पार्लमेंट कडूनच ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतात धर्मप्रसार करण्यावर बंदी होती. १८१३ चा चार्टर जारी करण्यासाठी इंग्लंडमधील मिशनरी व त्यांचे सहानुभूतीदार लोक यांनी सरकारवर दबाव आणून भारतातील ख्रिस्ती धर्मप्रसारासंबंधी अनुकूल निर्णय घडवून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न चालवले होते. त्याला यश येऊन १८१३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात असलेल्या भारतीय प्रदेशात धर्मप्रसार करण्यास मिशनऱ्यांना परवानगी मिळाली. हॉल व नॉट यांनी मुंबईमध्ये काम सुरू केले. पाठोपाठ १८२० मध्ये रेव्हरंड कॅनेडी हा लंडन चर्च मिशनरी सोसायटीचा प्रतिनिधी म्हणून मुंबईत आला आणि १८२२ ते १८२४ या काळात स्कॉटिश मिशनरी मुंबईला दाखल झाले. सतराव्या शतकातील पोर्तु़गीज मिशनऱ्यांपेक्षा हे मिशनरी वेगळे होते ते कॅथलिक पंथाशी संघर्ष करणाऱ्या सुधारणावादी प्रोटेस्टंट पंथाचे अनुयायी होते.